Hi all,
Got a great review for my production--
'शक्ती'तून उलगडले स्त्रीत्वाचे पैलू
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 27, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: shakti event, sakal rasik pariwar, pune
पुणे - अनंतकाळापासून सर्जनशीलता, कणखरता आणि वत्सलतेने जगाला व्यापून राहिलेल्या समर्थ स्त्रीत्वाचे पैलू बुधवारी "शक्ती' या कार्यक्रमातून उलगडले. कधी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, सरस्वती, तर कधी मुक्ताबाई, जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्री अशा मानवी रूपांमध्ये प्रकटणाऱ्या या स्त्रीत्वाला उपस्थितांनी मनापासून वंदन केले.
'सकाळ रसिक परिवारा'चा या वर्षातील शेवटचा कार्यक्रम नयनरम्य अशा नृत्याविष्कारातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन घडवून गेला. प्रसिद्ध नृत्यरचनाकार परिमल फडके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्स्फूर्त आविष्काराला रसिकांनी तितकीच समरसून दाद दिली. लावण्य, बुद्धी, उत्पत्ती, लय आणि ऊर्जा या शब्दांचा अर्थ परिमल फडके डान्स ग्रुपच्या पंधरा नर्तक कलावंतांनी अप्रतिम पदन्यास आणि भावमुद्रांतून उलगडला.
'जय शारदे वागेश्वरी', "आईचा जोगवा जोगवा मागेन', "उदे गं अंबे उदे', "गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये', "आल्या पाच गवळणी', "तू शूरवीर भद्र त्रिनेत्र शिवरुद्र' या रचनांवरील नृत्यांना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संत मुक्ताबाई, मातुःश्री जिजाऊ, पार्वतीबाई पेशवे, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या समर्थ पंचकन्यांना अनुक्रमे आकाशतत्त्व, सूर्यतत्त्व, क्षमातत्त्व, जलतत्त्व आणि वायुतत्त्व ही "थीम' घेऊन सादर करण्यात आले. पंचकन्यांच्या या स्मरणगाथेतून स्त्रीच्या खंबीर आत्मभानाचे दर्शन घडविण्यात आले. या सर्व स्त्रीरूपांच्या एकत्र सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. लोकनृत्याचा भाग रत्नाकर शेळके डान्स ऍकॅडमीच्या कलाकारांनी सादर केला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात या उपक्रमाबाबत "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये म्हणाले, 'गेली दोन वर्षे सकाळ रसिक परिवाराच्या माध्यमातून जो पाठिंबा मिळाला, त्यासाठी रसिकांचे आभार. अलीकडे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्याचे जाणवते. ती जपण्यासाठी विविध पातळ्यांवर होणाऱ्या प्रयत्नांप्रमाणेच "सकाळ'ने हा छोटासा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सदस्यत्व कोणा एका व्यक्तीऐवजी संपूर्ण परिवाराला देण्यामागे सर्वांनी वेळ काढून एकत्र यावे, अशी भूमिका होती. या परिवारातून एक मोठा परिवार सांधण्याचा हेतू होता. पुणेकर रसिक जाणकार, चोखंदळ आणि संस्कृतीचा विचार करणारे आहेत. यापुढेही "सकाळ' कलासक्त रसिकांना विविध उपक्रमांमध्ये सामावून घेणार आहे. या वर्षातील शेवटचा "शक्ती' कार्यक्रम खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या स्त्रीत्वाचे दर्शन देणारा आहे. परंपरेने आपण स्त्री-शक्तीची पूजा बांधतोय, तरी प्रत्यक्षात त्यांना दुय्यम स्थान मिळतेय, ही खेदाची बाब आहे.''
फडके म्हणाले, 'कोणताही मोठा प्रयोग साकारताना त्यामागे असणाऱ्या "टीम'ची मेहनत महत्त्वाची असते. "सकाळ'ने दिलेला पाठिंबा प्रेरणादायी होता.'' रत्नाकर शेळके, फडके आणि डॉ. राहुल देशपांडे यांचा पाध्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देशपांडे यांनी केले.
No comments:
Post a Comment